स्वप्न की सत्य...!
मी सोनाली. एक सर्व सामन्य मुलगी. मराठी माध्यमात शिकलेली. खूप लहान वयात वाचनाची आवड जडली. पुस्तकं वाचणे, वृतपत्राचा आढावा घेणे, त्यावर सखोल चर्चा करणे, मग त्यावर आपल्याला नक्की काय वाटतं आहे आपलं नक्की काय मत आहे हे लिहायला लागले. हीच आवड वय आणि वेळेसोबत वाढतच गेली. वाचन हे विचारांना धार देत गेलं. स्वतःची स्वतंत्र्य मतं तयार होत गेली. मग ती व्यक्त करण्याची धडपड सुरु झाली. आपली मत मांडायची म्हटल तर ती अशीच कुठे ही मांडता येत नसतात हे खूप कमी वयात लक्षात आलं. त्यासाठी एक योग्य व्यासपीठ हवं हे ही समजलं. मग शाळेत असतानाच आपण एक लेखिका, कवयत्री, वक्ता, रेडिओ जॉकी, किंवा उत्तम वृत निवेदिका व्हावं असं वाटू लागलं. शाळेत असताना वर्गात कुणी विचारलं की मोठं झाल्यावर तुला काय व्हायचं आहे ? तर सर्वाची नेहमीची उत्तर ठरलेली असायची. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, किंवा अंतराळवीर... मी मात्र दिमाखात सांगणार उत्तम लेखिका किंवा पत्रकार... काही तरी वेगळं उत्तर आलं की शिक्षकांना कौतुक वाटायचं. मलाला, सुहास शिरवळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फूले, ताराबाई शिंदे, बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम महाराज अशा एक न अनेक संताना वाचत मी मोठी झाले.
त्यावेळी लेखिका किंवा पत्रकार होण्यासाठी नक्की काय करायच असत याची कल्पना नव्हती. सर्वांच्या पालकांना जस वाटत की आपल्या पाल्याने शासकीय सेवेत जावं एखादी सरकारी नोकरी करावी तसच काहीस माझ्या आई वडिलांना सुध्दा वाटायचं. परिस्थिती हालाखीची असताना सुद्धा मला स्पर्धा परीक्षेचा क्लास लावला गेला. मी कॉलेज आणि क्लास मन लावून करायचे. धावपळ ही खूप व्हायची.
पण सरकारी नोकरी करताना मी समाधानी असेल का? 9 ते 6 जॉब करताना माझी ही घुसमट होईल का? मला ही मन मारून जगावं लागेल का ? हे असे एक न अनेक प्रश्न कायस्वरूपी मनात असायचे.
मला पत्रकार व्हायचं आहे हे घरी सांगितलं. पण पत्रकारिता म्हणजे कायम फिरतीचा प्रवास किंवा हाती माईक घेऊन थेट बातमी देणारी एखादी व्यक्ती. एवढीच कल्पना पत्रकारितेबद्दल घरच्यांना होती. म्हणून सर्वात आधी घरूनच विरोध झाला. घरच्यांचा विरोधात जाणं मला ही मान्य नव्हतं. आपल्या स्वप्नासाठी आई वडील किती खंबीर असावे हे समजलं. इतिहास या विषयात बी. ए पूर्ण केलं. पत्रकरिता हे खूप मोठं आणि विस्तीर्ण असं क्षेत्र आहे हे घरच्यांना समजण्यात 3 वर्ष गेले. कशीबशी त्यांनी एम.ए पत्रकारिता करण्याची परवागी दिली. प्रवेश भेटला. पण प्रत्यक्ष शिकता आलं नाही करणं कोविड19 च पाहिलं लॉकडाऊन. आणि त्यांच लॉकडाऊन मध्ये आलेलं वडिलांचं आजार पण. घरात वडील एकटे कमावणारे. त्यात मी घरातली मोठी मुलगी. म्हणून जबाबदारी वाढली. म्हणून कुटुंबाला आधार म्हणून जॉब करावा लागला. लॉकडाऊन असल्याने रेगुलार कॉलेज करता आलच नाही. परिणामी आता माझ्याकडे पत्रकरितेची डिग्री आहे पण त्याचं प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुभव नाही.
यानंतर हि कुठे संधी मिळते का याचा खूप शोध घेतला पण काही गोष्टी लक्षात आल्या त्याम्हणजे एक मीडिया मध्ये काम करायचं म्हटलं की तुमची मजबूत ओळखं असावी लागते हे लक्षात आलं. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतात पण इथेही कास्टइजम आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आला आणि हीचं खंत मानत घर करून गेली. मीडियामध्ये काम करायच म्हणजे तुम्हाला कामाचा अनुभव हवाच पण काम मिळालं नाही म्हणून अनुभव सुध्दा नाही.
मग एकटीनेच पुणे गाठायच ठरवलं. काहींनी सुचवल की या क्षेत्रात कुठे तरी शिकाऊ म्हणून काम कर (इंटर्नशिप) पण या कामाचे पैसे मिळत नाही. अस असेल की पुनः घराचा प्रश्न सामोर आ... वासून उभा राहतो. त्यात घरून आर्थिक आधार नाही. त्यात अनोळखी शहरात राहायचं कस? खायचं काय? म्हणून मग ना इलाज म्हणून पुण्यात आयटी मध्ये जॉब करायला सुरुवात केली. रोज सकाळी ऑफीसला जाणे आणि संध्याकळपर्यंत घरी येणे यातच आज एक वर्ष संपलं.
पण वर्षापासुन आयटी मध्ये काम करताना एक लक्षात आलं ही समस्या फक्त माझ्या एकटीची नाही. असे किती तरी तरुण मूल मुली आहेत ज्यांना कधीचं योग्य संधी मिळाली नाही म्हणून आपल्याला मना विरुद्ध आपल्या आवडी निवडीशी विसंगत असणाऱ्या क्षेत्रात फक्त ना इलाज म्हणून ते काम करतं आहेत. आणि या सगळ्यात लॉकडाऊने सुध्दा मोलाचं योगदान दिलं आहे.
फक्तं गंमत म्हणून सोबत काम करणाऱ्या सहकारी मित्र मैत्रिणीला विचारल की तुझं शिक्षण कोणत्या क्षेत्रात झालं आहे तर उत्तर अगदी विरुद्ध येतं आणि काम मात्र कुठल्या तरी वेगळ्याच क्षेत्रात करत आहेत. असे एक नाही अनेक तरुण मुलमुली तुम्हाला योग्य संधीच्या शोधात दिसतील. ज्यांची स्वप्न, आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी घेतलेली धडपड, अंगी असलेले कलागुण, आणि संधी न मिळाल्यामुळे संपत चाललेली इच्छाशक्ती आणि महत्वकांक्षा. सगळं माती मोल होण्याची वेळ आली आहे...
आता आम्हा सर्वा सामोरं प्रश्न एकाच आहे. या सगळ्याला कोण करणीभूत आहे ?
जाता जाता एवढेच म्हणेल..
हसरते कुछ और है।
वक्त की इल्तजा कुछ और है।
कोन जी सका है जिंदगी को आपने मर्जिसे।
दिल चाहता कुछ और है होता कुछ और है।
लेखिका
सोनाली आबासाहेब आहीरे
sonaliahire718@gmail.com
Comments
Post a Comment